Mulagach Pahije Mhanun… (मुलगाच पाहिजे म्हणून...) - मनोहर महादेव भोसले
Mulagach Pahije Mhanun… (मुलगाच पाहिजे म्हणून...) - मनोहर महादेव भोसले

Mulagach Pahije Mhanun… (मुलगाच पाहिजे म्हणून...) - मनोहर महादेव भोसले

  • Mulagach Pahije Mhanun… (मुलगाच पाहिजे म्हणून...) - मनोहर महादेव भोसले
  • Price : Free
  • KavitaSagar Digital Library, Jaysingpur
  • Language - Marathi
This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

दीर्घकथा मुलगाच पाहिजे म्हणून... मनोहर महादेव भोसले कवितासागर प्रकाशन 02322 - 225500, 09975873569 www.KavitaSagar.com KavitaSagar कवितासागर o Registered with the International ISBN Agency, London, UK and The Government of India, Ministry of Human Resource Development, New Delhi o Title - Mulagach Pahije Mhanun… (मुलगाच पाहिजे म्हणून...) o Author - Manohar Mahadev Bhosale (मनोहर महादेव भोसले) मु. पो. सैनिक टाकळी - 416108, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र संपर्क : 9767044509, manoharbhosale701@gmail.com, www.sainiktakali.com o Year of Publication - eBook - September 05, 2015 (सप्टेंबर 05, 2015) - pBook - October 02, 2015 (ऑक्टोबर 02, 2015) o Edition's - First (प्रथम आवृत्ती) o Volume - One (खंड पहिला) o Price - Rs. 65/- (मूल्य ६५/- रुपये) o Subject - Long Story (दीर्घकथा) o Language - Marathi (मराठी) o Total 36 Pages including covers. o Copyright © Manohar Mahadev Bhosale मनोहर महादेव भोसले All rights reserved. No part of this publication may be reproduced, stored in a retrieval system or transmitted, in any form or by any means, electronic, mechanical, photocopying, recording or otherwise, without the prior permission of the copyright holder. Only the publisher can export this edition from India. Due care has taken to ensure that the information provided in this book is correct. However, the publishers bear no responsibility for any damage resulting from any inadvertent omission or inaccuracy in the book. o Published in India in 2015 by - Dr. Sunil Patil (डॉ. सुनील पाटील) On Behalf of KavitaSagar Publication (कवितासागर प्रकाशन) Jaysingpur - 416101, Taluka - Shirol, District - Kolhapur, Maharashtra, India 02322 - 225500, 09975873569, kavitasagarpublication@gmail.com, sunildadapatil@gmail.com, sunil77p@rediffmail.com, www.KavitaSagar.com o Typesetting by - Dhudat Desktop Publishing Center o Cover Design by - Shrikant Shinde (श्रीकांत शिंदे) o Printed and Bound in India by - KavitaSagar Printing Services o Views expressed in this book are entirely those of the respective Authors and do not represent the opinions or thoughts of the Publisher II अर्पण II वंशाला नव्हे... माणसाच्या अंशाला समर्पित. - मनोहर महादेव भोसले दर्पण… स्त्रीभ्रूण हत्या आजचा अगदी ज्वलंत प्रश्न अगदी शतकांपासून चालत आलेली ही परंपरा आज समाज पुरुषाला कॅन्सरप्रमाणे गलितगात्र करून चाललेली आहे. शासन, सामाजिक संस्था आणि अनेकजण या प्रश्नाच्या समस्येचा पाठपुरावा करत आहेत. समाजात जागृती झाल्याशिवाय हा प्रश्न सुटणारच नाही, किंबहुना सामाजिक समतेची जाणीव निर्माण करणे केवळ हाच एक मार्ग आता समाजासमोर आहे. लेखक मनोहर भोसले यांचे हे पुस्तकसुद्धा ही जाणीव जागी करण्याचा प्रयत्न करणार आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे यात जरी एक मोठ्ठा गहन विषय घेतला असला तरी त्याची हाताळणी खूपच सहज सुंदर आणि पाण्यासारखी प्रवाही आहे. एका खटल्याच्या स्वरुपात हा विषय आपल्यासमोर उभा राहतो, असा वाद जो अनेक कुटुंबात प्रत्यक्षरित्या अस्तित्वात आहे, त्या वादाचे प्रतिनिधित्व हा खटला करतो. आता कोर्ट केस म्हटलं की, आपल्यासमोर दोनच बाबी उभ्या राहतात आणि त्या म्हणजे एक सिनेमातलं कोर्ट जिथे सीनचे बटबटीत स्वरूप किंवा पुस्तकातलं तपशीलवार वर्णन, ह्या दोन्हीही गोष्टी पचनी न पडणा-या न भावणा-या, पण इथे लेखक मनोहर भोसले हे तपशिलाच्या भानगडीत पडत नाहीत, स्त्रीभ्रूण हत्या हा विषय आणि मांडण्यासाठी वापरलेलं माध्यमही कोर्ट केस सारखं बोजड, असं असूनही मनोहर भोसलेंनी हा विषय मांडण्यासाठी संवादाचं परिणामकारक व टोकदार माध्यम वापरलंय, जे वाचकांच्या मनाला आरपार भेदून जातं. संवादाच्या माध्यमातून त्यांनी स्त्रीभ्रूण हत्येशी निगडीत धार्मिक संस्कार, सामाजिक परंपरांचा पगडा, त्याचे परिणाम, मनुष्य जन्मामागचं विज्ञान हे सगळे विषय मांडलेत पण त्याची रचना अगदी सोपी, सुटसुटीत आणि रोचक अशी केली आहे. या पुस्तकात वापरलेली भाषा खूप सहज, अगदी बोलीभाषाच, जी अतिशय मार्मिकपणे समाजातल्या व्यंगावर बोट ठेवते, या दीर्घकथेतील एकही संवाद ‘विनाकारण’ आणि ‘संदर्भहीन’ नाही किंबहुना संवाद हेच या दीर्घ कथेचं मूळ सामर्थ्य आहे. या दीर्घकथेचं कथानक अवघ्या चार पाच ओळीत सांगता येईल, ‘तीन मुली असलेलं एक जोडपं, मुलगा हवा ह्या हव्यासापायी नव-याने, कोर्टात घटस्फोटाची केस दाखल केलेली आहे, आणि आपल्याला मुलाचं पितृत्व मिळू शकलेलं नाही याचा दोष तो पती स्वतःच्या पत्नीच्या माथ्यावर थोपवू पाहतो आणि त्याच्या या आरोपाचं खंडन होताच, तोच पश्चातापदग्ध पती आपल्या पत्नीचा नव्याने स्वीकार करतो. पण हे कथाबीज फुलवतांना लेखक मनोहर भोसले यांनी जे तपशीलाचे आयाम पुरवतात त्यातून त्यांच्यातल्या लेखणीच्या सामर्थ्याचच दर्शन आपल्याला होतं. आपल्याला प्रथम या कथेचे नायक-नायिका हे पती-पत्नी आहेत असं वाटतं. पण त्यांच्या वकिलांनाच लेखकाने या दीर्घकथेचे नायकत्व बहाल केलंय. यातील पती रंगवतांना अन्य कुणीही खलनायकी वळणाने रंगवला असता पण मनोहर भोसले यांनी इथे तो मोह टाळला आहे, त्या पतीचा अहंकार, अज्ञान वितळून त्यांनी त्याला सामान्य माणूसपणच बहाल केलंय. लेखकाने सुरवातीलाच भारतीय समाजव्यवस्थेत धर्मव्यवस्थेत स्त्री आणि पुरुष यांच्यातल्या भेदाचा, उच्च-निच्चतेच जो स्तर जपला जातो त्याचा खुबीने वापर केला आहे, या समाजव्यवस्थेत जी अमानुषता आहे ती अमानुषता अधोरेखीत करून तिथेच संघर्षाच्या बिंदूचा आरंभ केलेला आहे. या दीर्घकथेमध्ये जे विज्ञान सांगितलेलं आहे म्हणजे क्रोमोसोमस गुणसूत्राच X आणिY चं गणित, हे समाजापर्यंत पोहोचणं गरजेचंच होतं, कारण मुलगा किंवा मुलगी होणं याला केवळ स्त्री जबाबदार आहे, ही मानसिकता बदलाने आवश्यकच आहे. मुलगा होत नाही म्हणून दुसरा विवाह करणे हे तर ब-याच ठिकाणी यापूर्वी घडलेलं आहेच मात्र स्त्री हि फक्त ‘भूमी’ ची भूमिका करते याची जागृती करण्याचा लेखक मनोहर भोसले यांनी जो प्रयत्न केलेला आहे तो अतिशय यशस्वी झालेला आहे. छान चमकदार संवादाचा वापरही लेखकाने या दीर्घकथेत केलेला आहे. उदाहरणार्थ - ‘माणसाच्या आयुष्यात जोडीदारचं फार महत्व आहे. एकमेकांना साथ देत माणूस मोठ मोठ्या संकटांना सहज पार करून जातो. मात्र जोडीदाराशिवाय माणसं एकाकी पडतात.’ ‘अनेक भोळ्या, भाबड्या आणि अडाणी बहिणींशी अत्यंत गोड बोलून त्यांची हक्क सोडपत्रावर सही घेतली जाते / अंगठा घेतला जातो. परंतु कधी तरी दिवाळीत भाऊबीजेला, कधी तरी रक्षाबंधनाला असा अंगठा आपल्या कपाळावर उठवून घ्यायला किती भाऊ आपल्या बहिणींकडे जातात हा प्रश्नच आहे.’ ‘आम्हांला कुठे आमचा वंश पुढे वाढवायचा असतो. आम्हांला म्हणजे स्त्रियांना अंश वाढवायचा असतो अंश.’ ‘माती आणि मता ह्या दोन्ही सारख्याच गोष्टी आहेत. आणि या दोघीही आपल्या उदरात पडेल ते स्वीकारतात, त्याला वाढवतात आता बीज लावणा-यानं ठरवायला पाहिजे की आपण जमिनीत फळांच झाड लावायचं की फुलांचं लावायचं.’ लेखक मनोहर भोसले यांच ‘सैनिकी परंपरेच गाव - सैनिक टाकळी’ हे पुस्तक मी पूर्वी वाचलं आहे, ते पुस्तक माहितीपर असूनही कुठेही क्षणभरासाठी ही रेंगाळत नाही, इतकी त्यांची भाषा सहजसुंदर आहे आणि या पुस्तकात सुद्धा त्यांचे भाषा कौशल्य क्षणोक्षणी जाणवत राहते. हे पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेववत नाही हेच या लेखकाचं यश आहे. लेखक मनोहर भोसले यांच्याकडून वाचकांच्या अपेक्षा नक्कीच उंचावतील अशी मला खात्री आहे तसेच त्यांच्याकडून इथूनपुढेही अशीच दर्जेदार साहित्य निर्मिती होत राहो. त्यांच्या या साहित्य रचनेबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व भविष्यकालीन कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा! समाजात जशा प्रकारे लेखन करणारे, समाज प्रबोधन करणारे प्रतिभावंत लेखक-कवी आहेत त्याच प्रमाणे कलाकारांच्या कलागुणांचे कौतुक करून त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करणारे दानशूर सुद्धा आहेत त्यापैकीच श्री. विजय यशवंत पाटील (प्रगतशील शेतकरी, सैनिक टाकळी) आणि सौ. सीमा विजय पाटील (सभापती - बांधकाम व आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर) यांनी लेखक मनोहर भोसले यांच्या पाठीवर केवळ शाबासकीची थाप न मारता त्यांना ख-या अर्थाने हे पुस्तक वाचकांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी अत्यंत मोलाचा सहभाग दिला त्याबद्दल त्यांचे आभार आणि अभिनंदन... तसेच जयसिंगपूर येथील कवितासागर प्रकाशन संस्थेचे संचालक - प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांनी ‘मुलगाच पाहिजे म्हणून...’ हे पुस्तक प्रकाशित करून जगभरातील वाचकांपर्यत पोहचवण्याचे कार्य करून मनोहर भोसले यांना पाठबळ दिले त्याबद्दल डॉ. सुनील पाटील यांना मन:पूर्वक धन्यवाद... - सौ. माधुरी श्रीकांत काजवे (अॅडव्होकेट व नोटरी) १६ / ११५४, शिवाजीनगर, इचलकरंजी, जिल्हा - कोल्हापूर संपर्क - ७३८७६७७७४४, ७३८५२१११७० माझं मन सांगतय... अर्थात मनोगत एकदा एके ठिकाणी वधू परीक्षेच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा प्रसंग आला होता. मुलगा-मुलगी दोघांनी एकमेकांना पसंत केलं होतं. लग्नाच्या याद्या लिहिल्या जाणार होत्या. एकमेकांच्या आशा, अपेक्षा सुरु होत्या. मुलगा म्हणाला, ‘लग्नानंतर विभक्त राहता येणार नाही. माझ्या आई-वडिलांचा सतत मान-सन्मान राखावा लागेल.’ त्यानंतर ती विवाहोत्सुक मुलगी म्हणाली, ‘चांगली गोष्ट आहे. मला मान्य आहे. परंतु माझीही एक अट आहे.’ ‘कोणती?’ ‘लग्नानंतर गरोदरपणात गर्भलिंग चाचणी करून घेता येणार नाही. करण्याची वेळ आलीच तर मुलगा, मुलगी असा लिंग भेद करता येणार नाही. जे होईल ते अपत्य स्वीकारावं लागेल. ‘मुलगाच पाहिजे म्हणून...’ मुलगी असलेला गर्भ खाली करता येणार नाही.’ बैठकीला बसलेल्यांची बोलती बंद झाली होती. मला त्या मुलीच्या धाडसाचं कौतुक वाटलं होतं. नव-या मुलाच्या घरात शौचालय नाही म्हणून लग्न मोडलेलं मी पाहिलंय. शौचालय बांधण्यासाठी घरच्या महिलेन आपलं स्वतःचं मंगळसूत्र विकलेलं मी पाहिलंय. परंतु लग्न ठरवतांनाच भविष्यात जन्माला येणा-या बाळाची मुलगा किंवा मुलगी असा लिंग भेद न करण्याचे साहस दाखवणारा हा कदाचित पहिलाच प्रसंग होता. या प्रसंगाने मी प्रभावीत झालो होतो. मुलगा, मुलगी, स्त्रीभ्रूण हत्या, वंश, वारस या विषयावर काही तरी लिहावं असं वाटायचं. मनात भरलेले विचार खदखदायचे आणि शेवटी या विचारांचा स्फोट पुस्तक रुपात झाला. अशाच विचारांच्या निखा-यांनी नव्या पिढीच्या महिलांनी आपल्या सुखी संसाराच्या चुली पेटवाव्यात असं मला वाटतं. अनेक वर्षापासून महिला स्वातंत्र्याची सुरु असलेली चळवळ आता कुठे मार्गाला लागली आहे. सुरुवातीला या महिला स्वातंत्र्याचा वेगळाच अर्थ काढला जायचा. मंगळसूत्र-कुंकू नको, पोषाखाचे स्वातंत्र्य, पुरुषी वागणं इत्यादी सारख्या विचारांच्या प्रसारामुळे सर्व सामान्य बहुसंख्य स्त्रिया यातून बाहेर पडल्या. मुळात ही चळवळ पुरुषांच्या शतकानुशतके जोपासल्या पुरुषी अहंकारा विरुद्ध होती. कालानुरूप बदलू न शकलेल्या पुरुषांनी या चळवळीला बदनाम केलंच परंतु काही स्त्रियांच्या अतिरेकी वागण्यामुळेसुद्धा ही चळवळ नाहक वाईट ठरली गेली. तळागाळातील असो अथवा उच्चभ्रू असो स्त्रीला एक माणूस म्हणून चांगली वागणूक मिळावी ही मागणी रास्तच आहे. मानव जातीच्या विकासासाठी मुलींच्या शिक्षणा इतके परिणामकारक दुसरे साधन नाही. एक मुलगी शिकली, सुशिक्षित झाली तर काही पिढ्या शिकल्यासारख्या आहेत. आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात टी. व्ही., रेडीओ, मोबाईल, इंटरनेट अशा प्रसार माध्यमातून महिला जागृत होत आहेत. संघटीत होत आहेत. अन्याया विरुद्ध आवाज उठवत आहेत. प्रसंगी सरकारला कायदा करण्यास भाग पाडत आहेत. महिलांसाठी सरकार नव-नवीन योजना राबवत आहे. मुलगी जन्माला घालणा-या कुटुंबाला अर्थ सहाय्य, बँकेत ठेव पावती, मुलींसाठी मोफत शिक्षण, रेशन कार्ड आणि घराच्या उता-यावर महिलांचे नाव. तसेच महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण लागू झाले आहे. परंतु कितपत लाभ घेतला जातो हा एक प्रश्नच आहे. मुळात विचार बदलले पाहिजेत. पूर्वी सोनोग्राफी तपासणीची साधने नव्हती. लोक आपले नशीब म्हणून जन्माला येणारे असेल ते बाळ स्वीकार करायचे. आनंदात राहायचे. फक्त एका सोनोग्राफी मशीनचा शोध लागल्याने सारी व्यवस्थाच बदलून गेली. शरीरात होणारे बदल उग्ररूप धारण करण्याआधी टिपता आले तर त्यावर योग्य उपचार करता यावा किंवा गर्भामध्ये काही व्यंग असेल तर त्यावर योग्य निर्णय घेता यावा या दृष्टीने सोनोग्राफी आशेची वाटली. मात्र त्याचाही गैरवापर होवू लागल्याने एक नवी समस्याच निर्माण झाली. गर्भलिंग चाचणीमधून स्त्रीभ्रूण नष्ट करण्याची मानसिकताच निर्माण झाली. काही धूर्त डॉक्टरांनी याला प्रचंड पैसा मिळवण्याचा मार्ग मानला. वंशाला दिवा पाहिजे म्हणणारे लोक हजारो रुपये खर्च करून गर्भातच मुलींना संपवू लागले. हा अक्षम्य अपराध आहे. शांत डोक्याने, नियोजन पूर्वक केली जाणारी हत्या आहे. यासाठी किरकोळ शिक्षा न होता कायद्याने फाशीच व्हायला हवी तरच गर्भलिंग चाचणी करणा-यावर दहशत बसेल. काही लोक सहज बोलून जातात, ‘अरे वाह... तुम्हांला दोन्ही मुलंच आहेत वाटतं?’ आणि या उलट दोन मुली असतील तर म्हटले जाते, ‘अरेरे... तुम्हांला दोन्ही मुलीच आहेत वाटतं?’ ही, अरे वाह.. आणि अरेरे.. ची मानसिकता बदलायला हवी. ‘मुलगा वंशाचा दिवा आणि मुलगी पराया धन’ म्हणून सोई-सुविधा आणि वागणूकही वेग-वेगळी दिली जाते हे अत्यंत वाईट आहे. वंश, वारस आणि पूर्वज या वरून मला एक गंमत आठवली. एक लहान मुलगा आपल्या आईला मोठ्या कौतुकाने म्हणाला, ‘आई.. आई.. आपले पूर्वज माकड होते म्हणे खरं आहे कां गं?’ ‘आता ते मला कसं कळणार?’ आपल्या नव-याला टोचून बोलण्याची संधी साधत त्या मुलाची आई म्हणाली, ‘मी तर इथं परवा नांदायला आले आहे. तुमच्या पूर्वजांबद्दल तुझ्या बाबांनाच विचार... तेच वंश पुढे चालवत आहेत.’ सांगायचं तात्पर्य एवढंच की जन्माला आलेलं बाळ वंश म्हणून नव्हे तर माणसाचा अंश म्हणून पाहण्याची गरज आहे. मुलगा आणि मुलगी भेद करणे अयोग्य आहे. एका निरीक्षणामध्ये असे आढळून आले आहे की, चांगल्या संस्काराच्या, चांगल्या शिक्षणाच्या नावाखाली काही लोक आपल्या मुलांना आपल्यापासून दूर ठेवतात त्यापैकी काही मुलं पुढे मोठी झाल्यावर सुद्धा आपल्या कुटुंबापासून किंबहुना आपल्या आई वडिलांपासून दूर राहतात किंवा त्यांना आपल्यापासून दूर ठेवतात. वृद्धाश्रम निर्माण होण्यामागचे हे एक कारण आहे. या उलट आपल्या आई-वडिलांसाठी, कुटुंबासाठी काही मुली अविवाहित राहून सेवा करत असल्याची काही उदाहरणे आहेत. रस्त्यावरून जातांना होणारी छेडछाड, चोरी, बलात्कारासारख्या प्रसंगांना रोखता यावं यासाठी लाठी काठी फिरवणे, तलवारबाजी, दांडपट्टा किंवा कराटे यासारखे मर्दानी खेळ महिला व मुलींनी जरूर शिकायला हवेत. चारचाकी नसली तरी मोटारसायकल, सायकल चालवता यावी. पोहता यावं. लग्नानंतर या गोष्टी शिकणे अवघड आहे. म्हणून शाळा कॉलेजमध्ये शिकत असतांनाच या सर्वांचे योग्य ते धडे घेतले पाहिजेत. स्त्रीची प्रतिष्ठा फक्त वीर माता, वीर पत्नी होण्यात नाही तर वीर स्त्री होण्यात आहे. म्हणून यासाठी सर्वांना सांगू इच्छितो आता महिलांचे युग येत आहे. संधी गमावू नका. उठा, आणि तुमची सकारात्मकता, मौलिकता जगाला दाखवा. आपल्या कलागुणांची जोपासना करा, त्याचा समाजासाठी उपयोग व्हावा म्हणून स्वतःला सिद्ध करा. थोड्या धाडसी महिलांना आपली न्यायची बाजू भक्कमपणे मांडता यावी यासाठी ‘मुलगाच पाहिजे म्हणून...’ या दीर्घकथेत दोन वकिलांचा कोर्टातील वाद - विवाद सादर केला आहे. ही दीर्घकथा पूर्णतः काल्पनिक आहे. यामधले प्रसंग आणि व्यक्ती एखाद्या घटनेशी मिळत्या - जुळत्या असल्या तर तो केवळ एक योगायोग असू शकतो. जनजागृती हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे विशेष पुस्तक तयार केले आहे. मुलां - मुलींनी आपल्या शाळा, कॉलेजमध्ये या विषयावर कथा - कथन करावे किंवा नाटिका सादर कराव्यात. वाचकांना हे पुस्तक नक्कीच आवडेल. ‘मुलगाच पाहिजे म्हणून...’ हे विशेष पुस्तक अर्थात दीर्घकथा आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी जयसिंगपूर येथील कवितासागर प्रकाशनचे कार्यकारी संचालक डॉ. सुनील पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद. तसेच माझे मित्र सोपान धुमाळे, सचिन प्रभाकर पाटील, श्री. विजय यशवंत पाटील (प्रगतशील शेतकरी, सैनिक टाकळी) आणि सौ. सीमा विजय पाटील (सभापती - बांधकाम व आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर) आणि तसेच सर्व ज्ञात - अज्ञात व्यक्तींच्या सहकार्यास मन:पूर्वक धन्यवाद... - मनोहर महादेव भोसले