Vividha (विविधा)
Vividha (विविधा)

Vividha (विविधा)

This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

मनोगत नव्हते मला असे की होईल वाटले झाले परी आता हे मम भाग्य थोर झाले ध्यानीमनी नसतांना माझ्या काव्यांचा संग्रह प्रकाशित होत असल्याचा हा प्रसंग एक सोनेरी स्वप्न होय. ०८ मार्च २०१३ रोजी शुक्रवारी माझ्या सुविद्य पत्नीचे निधन झाले तेंव्हा मी पूर्णपणे संपल्यातच जमा होतो. पण ईश्वरीलीला अगाध आहे. पत्नीच्या निधनानंतर केवळ २२ दिवसांनी जणू चमत्कारच झाला. २९ मार्च २०१३ रोजी शुक्रवारी (माझी पत्नी वारली तो दिवस शुक्रवारच होता) माझ्या मनात काय आले कोण जाणे! त्या दिवसापासून म्हणजे २९ मार्च २०१३ पासून १८ जुलै २०१३ पर्यंत मी अविरत काव्यरचना करत गेलो आणि आश्चर्य म्हणजे मजकडून रचल्या गेलेल्या काव्यांची संख्या शंभर इतकी झाली. पुढे हळू हळू आणखी त्यात चाळीस पन्नास काव्यांची भर पडली. मी माझ्या गावी जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदूम हौसिंग सोसायटी येथे माझ्या घरी ०७ ऑगस्ट २०१३ रोजी गेलो होतो आणि माझ्या ध्यानीमनी नसतांना एक सुवर्णमयी घटना घडली. ०९ ऑगस्ट २०१३ क्रांतीदिनी जयसिंगपूर येथे कवितासागर प्रकाशनद्वारा प्रकाशित घुसमट कवितासंग्रह आणि गांव पांढरीची गाणी कवितासंग्रह या दोन कविता संग्रहाचा संयुक्त प्रकाशन सोहळा आणि कवी संमेलन आयोजित केले होते. या कार्यक्रमाला डॉ. मगदूम हौसिंग सोसायटीतील माझे मित्र प्रा. सीताराम दतात्रय चव्हाण यांनी मला आग्रह करून नेले. जातांना बरोबर काव्याच्या वह्या घ्यावयास लावल्या. काव्य संमेलन स्थळी जाताच माझे परम मित्र कवी डी. बी. चिपरगे यांनी माझे उत्स्फूर्त स्वागत केले. आणि मला माझ्या दोन कविता वाचावयास लावल्या. एक - “माणूस माझी जात” आणि दुसरी - “गर्भस्थ मुलींचे हुंकार”. हया कविता ऐकून कवी चिपरगे भारावून गेले. पुढे जयसिंगपूर येथून प्रसिद्ध होणा-या “कविता सागर दिवाळी अंक २०१३” च्या अंकात व यड्राव येथून प्रसिद्ध होणा-या साद प्रतिसाद पाक्षिकात माझ्या कविता प्रसिद्ध झाल्या, त्याच बरोबर “कविता सागर भारताची राष्ट्रीय प्रतीके विशेषांकात” कवितेचे रसग्रहण व लेख प्रसिद्ध झाला. मी कधीही प्रसिद्धीकडे वळलो नव्हतो. पण मित्रवर्य कवी चिपरगे व कवितासागरचे प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांच्या प्रेरणेने “न भूतो न भविष्यति” घडले आणि काव्यसंग्रह अनेक (विविध) विषयांनी साकारला गेला. माझ्या परिवारातील सर्व, माझे नातलग, माझे मित्र यांची प्रेरणा म्हणजेच या काव्यसंग्रहाची निर्मिती होय. “तकदीर के आगे कुछ नहीं, समय के पहले कभी नहीं” हेच खरे, आता नेत्र पैलतीरी लागले आहेत, आणखी ५ महिन्यात मी ८१ व्या वर्षात पदार्पण करतोय. जीवनाच्या अखेरच्या क्षणी माझ्या हातून शारदेची व समाजाची सेवा घडवून आणण्याचा त्या विधात्याचा काय हेतू असावा कळत नाही. माझा पहिला वहिला “विविधा” काव्यसंग्रह प्रकाशित होत असतांना माझ्या कुटुंबियांना व मित्रवर्गाला होत असलेले समाधान पाहून मी भारावून गेलो आहे. माझ्या हातून काव्यसंग्रहासारखे कार्य होईल असे स्वप्नातही वाटले नाही. माझ्या या काव्यसंग्रहातील काव्यात काही उणीवा असतील तर वाचकांनी कृपया मजपर्यंत त्या पोहोच कराव्यात. माझा “विविधा” काव्यसंग्रह प्रकाशित होण्याबाबत ज्यांनी प्रेरणा दिली, मार्गदर्शन केले, प्रोत्साहित केले त्या सर्वांचा विशेषत: कवी डी. बी. चिपरगे, प्रकाशक डॉ. सुनील पाटील, कवी बाळ बाबर, प्रा. सी. द. चव्हाण, प्रा. वालावलकर (गुलमोहर कॉलोनी, सांगली) यांचा व इतर सर्वांचा मी ऋणी आहे. माझी मुले, सुना, कन्या, जावई, नातवंडे सर्वचजण उच्च शिक्षित असून सुस्थितीत आहेत. “चिंता मला न कसली आता मुळी कुणाची परी एक आस मोठी ते पैलतीर गाठण्याची” शेवटी एवढेच की - “तुम्ही उदार आश्रय दिला, म्हणून ही कला जगाला दिसली” धन्यवाद रघुनाथ सीताराम कुलकर्णी शुक्रवार, १६ मे २०१४ प्रस्तावना मी कवी होणार म्हणून कुणाला कधी कवी होता येत नाही; तो जन्मावा लागतो. मी कवी र. सी. कुलकर्णी यांच्या ‘विविधा’ काव्य संग्रहातील कविता मनापासून वाचल्या. वयाच्या ८२व्या वर्षामध्ये पदार्पण करत आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी उधळलेल्या काव्य सुमनांच्या सुगंधाने मला प्रसन्नता लाभली. विशेष म्हणजे या संग्रहाला प्रस्तावना देण्याचे काम ‘कवितासागर प्रकाशन’ जयसिंगपूरचे कार्यकारी संचालक डॉ. सुनील पाटील यांनी माझ्यावर सोपविले हे मी माझे भाग्य समजतो. मी र. सी. कुलकर्णी यांचा जीवनप्रवास अगदी जवळून पहिला आहे. निर्मळ, निर्गवी नि निष्कलंक चारित्र्याचे लेणे लेवून जे देणे आहे ते जनाच्या आणि छात्रगणांच्या झोळीत टाकत या सर्वसमावेशकता अंगी बाणलेल्या सम्यक दृष्टीच्या सरस्वतीच्या पुत्राने आपले उभे आयुष्य वेचले. परोपकारासाठीच हे शरीर आपल्याला प्राप्त झाले आहे याचे भान ठेवून जनसेवा, राष्ट्रसेवा तथा आत्मसेवा समर्पित भावाने केली. कर्म - धर्म दोन्ही मध्ये भगवंताचे रूप बघत, संसारात राहून त्यात न गुंतता.... ‘सत्यवादी करिती संसार सकळ | अलिप्त कमळदळ जैसे” या संत वचनाला साक्षी ठेऊन संसाराचा भार ही समर्थपणे पेलला. ८ मार्च २०१३ इसवी सन रोजी शुक्रवारी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रोहिणीताईंचे निधन झाले. या घटनेने गुरुजींना एकाकी पडल्यासारखे झाले खरे! मात्र गुरुजींनी धीर सोडला नाही. त्यातून ते सावरले. त्यांच्यातली प्रतिभा जागी झाली. जणू रोहिणीच साथीला आली. विविध ज्वलंत विषयावरील कविता एकामागून एक आकार घेत भराभर साकार झाल्या आणि त्यातूनच ‘विविधा’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाचा जन्म झाला तो त्यांनी आपल्या पत्नीच्या स्मृतींना अर्पण केला. अर्पण पत्रिकेतील कवितेत आपल्या पत्नीला उद्देशून ते म्हणतात... फेडणे उपकार तव, ही आस मनी मम लागली अर्पितो ही तव स्मृतीला, आज मी काव्यांजली. त्यांची प्रत्येक कविता एक वेगळा रंग घेवून येते. ‘जीवनगाथा’ ही कविता तर जीवन कसे जगावे म्हणजे ते चांगल्या त-हेने कसे जगावे, जीवन आहे तरी काय? त्यात कोणती मूल्ये रुजवावित हा मौल्यवान विचार सहजपणे देवून जाते. त्यातल्या ... जीवन म्हणजे सुंदर लेणे सत्कृत्याने जगवावे सत्य - अहिंसा - दया क्षमा अन् शांती बीजही रुजवावे या दोन ओळीचं प्रचीतीला पुरेशा आहेत असे वाटते. तसेच ‘कधी होशील तू माणूस’ या कवितेतून माणूस किती क्रूर आहे याचे दर्शन घडते. ‘तुझ्या क्रूरतेला आता मुळी अंत नाही; माणुसकी तुझिया ठायी राहिलीच नाही’ हे कवीचे उदगार किती अर्थपूर्ण आहेत हे आजकालच्या जगाकडे पहिले असता सहज लक्षात येते. त्याचं प्रमाणे दुष्काळ, नकोस विसरू माय - पित्यांना, रुसवा - फुगवा, अंती एकलाच, वृद्धावस्था, माणूस माझी जात, गर्भस्थ मुलींचे हुंकार अशा अनेक कविता संवेदनशील मनाला अंतर्मुख करणा-या आहेत. साधी, सरळ भाषा, प्रासादिकता, लयबद्धता ही त्यांच्या कवितांच्या मधील गुण वैशिष्ठे आहेत. त्यांच्या कविता वाचून वाचकांना काही क्षण अस्वस्थ व्हायला होते आणि त्यामुळे गुरुजी ख-या अर्थाने कवी म्हणू यशस्वी झाले आहेत असे मानायला हरकत नसावी असे माझे प्रांजळ मत आहे. योग्य संस्काराविना युवापिढी बरबाद होत आहे. प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, नैतिकता तथा सामाजिक बांधिलकी हरवून बसलेली ही पिढी सैरभर, दिशाहीन झाली आहे. त्यांना वळणावर आणणारे वाटाडेही दुर्मिळ झालेले आहेत. कधीही प्रसिद्धीची हाव न धरता निरपेक्ष बुद्धीने समाजासाठी झटणारी थोडी फार माणसे अजूनही समाजात शिल्लक आहेत; त्या पैकीचं एक म्हणजे गुरुजी! एकंदरीत अशा पार्श्वभूमीवर गुरुजींचा ‘विविधा’ हा काव्यसंग्रह जाणकार वाचकांना निश्चितच आवडेल आणि इतरांना मार्गदर्शक ठरेल अशी अपेक्षा करायला वाव आहे. रघुनाथ गुरुजी आपल्या सेवाकाळात बारा वर्षे माझ्या उमळवाड, तालुका शिरोळ या गावी मराठी शाळेत मुख्याध्यापक म्हणून अध्यापनाचे काम करत होते, त्यांच्या निरोप समारंभाचे वेळी अध्यक्ष या नात्याने त्यांच्या विषयी काव्यरुपाने जो माझा भाव प्रगट झाला त्या काव्यपुष्पाने या प्रस्तावनेला विराम देत आहे... धन्य! धन्य! रघुनाथा तू धवल यशाची गाथा तू छात्रगणांचा प्राण तू ऋषीमुनींचे ध्यान सकळांचे पूज्या स्थान तव चरणी लवतो माथा शुभं भवतु - डी. बी. चिपरगे उमळवाड, जिल्हा - कोल्हापूर - डॉ सुनील दादा पाटील, संपादक आणि प्रकाशक - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर सुदर्शन, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, नांदणी नाक्याजवळ, बायपास रोड, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र मोबाईल - 02322 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com Dr. Sunil Dada Patil Editor and Publisher of KavitaSagar Publication, Jaysingpur Sudarshan Palace, Plot # 16, Padmavati Society, Near Nandani Naka, Bypass Road, Jaysingpur - 416101, Taluka - Shirol, District - Kolhapur, Maharashtra, India Ph: 02322 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com