Ganv Shivaratil Phiniks - (गांव शिवारातील फिनिक्स) - Dr. Shrikant Patil (डॉ. श्रीकांत पाटील) - KavitaSagar Publication
Ganv Shivaratil Phiniks - (गांव शिवारातील फिनिक्स) - Dr. Shrikant Patil (डॉ. श्रीकांत पाटील) - KavitaSagar Publication

Ganv Shivaratil Phiniks - (गांव शिवारातील फिनिक्स) - Dr. Shrikant Patil (डॉ. श्रीकांत पाटील) - KavitaSagar Publication

This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

Preview

Ganv Shivaratil Phiniks - (गांव शिवारातील फिनिक्स) - Dr. Shrikant Patil (डॉ. श्रीकांत पाटील) - KavitaSagar Publication, Jaysingpur - ‘गांव शिवारातील फिनिक्स’ ही बालकुमारांसाठी लिहिलेली छोटेखानी कादंबरी आपल्या हाती देतांना मला मनस्वी आनंद होत आहे. निसर्गाच्या कुशीत, डोंगर द-यांच्या मुशीत असंख्य पक्षी सुखाने संचार करतात. पावसाळ्यात घरटी बांधून राहतात. तर उन्हाळ्यात मानवाने लावलेल्या आगीत - वणव्यात त्यांची घरटी जळून खाक झाल्यानंतर ती इतरत्र स्थलांतर करतात. काही बिचारी त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक होतात. मृत्यूला कवटाळतात. पण या पक्षी जातीमध्ये एखादा पक्षी असा असतो की, जो सारे काही संपले असतांनाही त्या राखेतून उंचच उंच अशी गगन भरारी घेतो. आकाशाला आपल्या कवेत घेतो. आकाशात मनसोक्त विहार करतो.   आपल्या सामाजिक पर्यावरणातही आपल्याला अशा अनेक व्यक्ती भेटतात जी सुखाने समाधानाने आपले जीवन जगत असतात. ते आनंदाने सुखावून जातात तर दु:खाला ताकतीने प्रतिकार करतात. काही जण अडथळा आला की मार्ग बदलतात व काहीजण दुस-या मार्गाने प्रवास करतात. समाजात काही पात्रे अशी असतात जी संकटांना, अडचणींना, अडथळ्यांना संधी मानून जोरदार प्रतिकार करतात व अमाप यश मिळवितात. मला हे सर्व सामान्य लोकांचे जगणे हे निसर्गातील पक्ष्यांप्रमाणे वाटते.   ‘गांव शिवारातील फिनिक्स’ या बालकादंबरीतील घटना, प्रसंग, पात्रे, ठिकाणे जरी काल्पनिक असली तरी त्याला निश्चितपणे वास्तवाचा आधार आहे. या कादंबरीचा नायक प्रकाश यांचा बालपणापासून ते उच्च पदस्थ अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास मी माझ्या डोळ्याने पाहिला आहे. घरची हलाखी, अठराविश्वे दारिद्रय, दोन चिमुकली भावंड, अत्यंत गरीब आई - वडील, चंद्रमौळी झोपडी, गांव शिवाराबाहेरील स्मशान, भयाण शांतता अशा प्रतिकूल परिस्थितीतून तो आला आहे. त्याचा पोरवयापासूनच जगण्यासाठी संघर्ष आहे. त्याला शिकण्याची आस आहे याचसाठी अपमानाची, अवहेलनेची आणि दारिद्रयाची तमा न बाळगता तो वेळ मिळेल तसे व तेव्हा शाळेत येतो. मार खातो पण शिकण्याची उमेद, जिद्द आणि चिकाटी सोडत नाही ही गोष्ट आज सुखवस्तू कुटुंबातील क्षुल्लक कारणासाठी शाळा चुकविणा-या मुलांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.   गरीबीने त्याला बरेच काही शिकवले आहे. फाटके कपडे, बंद तुटलेली पिशवी, वाकळेच्या दो-याने पाने एकत्र करून शिवलेल्या वह्या, अपूर्ण राहिलेला अभ्यास वर्गात पूर्ण करण्याची धडपड इत्यादी त्याचे अध्ययनाचे वेड अधोरेखित करते. उशिरा आल्यामुळे भरपूर मार खाणे तरीही आपल्या गुरुजींना दोष न देणे, आपली सारी जीवन कहाणी कुठलाही संकोच न बाळगता आपल्या शिक्षकांना सांगणे ह्या नायकाच्या कृतीमधून त्याची निरागसता आणि निष्पापता प्रकट होते.   मनामध्ये जिद्द, चिकाटी आणि कष्टाची तयारी असेल तर माणूस प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकतो. अन्यायाचे, अपमानाचे, दारिद्रयाचे चटके सोसूनही तो पर्वताचे शिखर चढण्याची तेनसिंगाची हिंमत बाळगू शकतो हीच उमेद मला त्या सहाव्या इयत्तेत शिकणा-या प्रकाशमध्ये दिसली. पंख जळालेले असतांनाही फिनिक्स पक्षी ज्याप्रमाणे आकाशात उंच भरारी घेऊन आकाशाला स्पर्श करण्याची जिद्द बाळगतो. तशीच जिद्द मला त्याच्या प्रत्येक कृतीत जाणवत गेली.   स्मशानात राहणे, जळत असलेली प्रेते पाहणे, मातीसाठी ठेवलेला नैवेद्य खाणे, मृतात्म्याला ठेवलेल्या वस्तू वापरणे यामध्ये त्याची अपरिहार्यता आहे. तो धडधडीत तसे आपल्या शिक्षकांना सांगूनही टाकतो. आई - वडिलांना मदत करणे, लहान भावंडांची काळजी घेणे, वेळ मिळेल तेव्हा शाळेत जाणे, पडेल ते काम करणे हा मानवी मुल्यांचा साठाच त्याच्या ठायी आहे.   नावाप्रमाणेच तो प्रकाश आहे. दारिद्राचा, अज्ञानाचा, अन्यायाचा काळोख भेदणारा तो प्रकाश आहे. सारे काही संपले तरी इतरांप्रमाणे गर्भगळीत न होता आता पुन्हा नव्याने सुरुवात करूया असे म्हणण्याची त्याची दृष्टी आहे. राखेतून गगन भरारी घेणारा तो सर्वार्थाने फिनिक्स आहे.   वडीलांच्या मृत्यूनंतर आईला आधार देणे, भावंडांची काळजी घेणे, महाविद्यालयीन शिक्षणासाठी सायकलवरून प्रवास करणे, पोटाची खळगी भरण्यासाठी हमाली करणे, घराचा गाडा चालवण्यासाठी खाजगी कंपनीत नोकरी करणे, होमगार्ड म्हणून भरती होणे, नोकरी करत करत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे, पोलीस म्हणून भरती होणे. वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करतांना आपल्या कुटुंबाची निगराणी करणे. आता नोकरी मिळाली म्हणून गप्प न राहता अभ्यासात सातत्य ठेवणे व खात्यांतर्गत परीक्षेत महाराष्ट्रात पहिला येऊन मुंबईसारख्या महानगरीत उच्चपदस्थ अधिकारी म्हणून रुजू होणे ही सारी त्याची यशाची चढती कमान पाहिली की त्याची ‘फिनिक्स’ अशीच ओळख दृढमूल होते.   ही साहित्यकृती लिहित असतांना केवळ रंजकतेत अडकून न पडता वास्तवाचा आधार घेऊन आपण प्रतिकूल परिस्थितीवरही कशी मात करू शकतो याचा वस्तू पाठ बालकुमारांसमोर निर्माण करण्याचा माझा मानस होता. त्या दृष्टीने मी हा अल्पसा प्रयत्न केला आहे. हा छोटेखानी ग्रंथ आपणास नक्कीच आवडेल, मुलांना प्रेरणादायी ठरेल अशी मला आशा, नव्हे खात्री आहे.   एक गरीब कुटुंबातला, फाटक्‍या कपड्‍यातला, तुटक्‍या चपलातल्‍या, फाटलेल्‍या वह्या शिवून वापरणारा, शिळं पाकं अन्न खाऊन तर कधी कधी स्‍मशानातला नैवद्य खाऊन मोठा झालेला पक्‍या आता मुंबईसारख्या महानगरीत एक रुबाबदार व्यक्‍तिमत्‍वाचा, कडक इस्‍त्रीच्या कपड्यातला, पॉलीश केलेले बुट परीधान केलेला व दिमतीला पंधरावीस पोलीसांची फौज असलेला मोठ्ठा पोलीस अधिकारी बनला आहे. त्‍याची ही वाटचाल जळून राख झालेल्‍या आणि राखेतून उडणार्‍या व गगनभरारी घेणार्‍या फिनिक्‍स पक्षासारखीच होती. नव्हे तो स्‍वत: आमच्या गांव शिवारातील फिनिक्‍सच आहे.   ‘गांव शिवारातील फिनिक्स’ ही बालकादंबरी पुस्तकरूपाने आपल्यासमोर आणणारे कवितासागर प्रकाशन संस्थेचे प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांचा मी अत्यंत ऋणी आहे. आपण रसिक वाचक या साहित्यकृतीचे नक्कीच जोरदार स्वागत कराल असा मला ठाम विश्वास आहे.                                  - डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील       ·        पुस्तक - गांव शिवारातील फिनिक्स ·        साहित्य प्रकार - बालकादंबरी ·        मूल्य - 80/- ·        लेखक - डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील ·        प्रकाशक - डॉ. सुनील दादा पाटील ·        प्रकाशन - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर ·        संपर्क - 02322 225500, 9975873569, 8484986064 ·        ईमेल - sunildadapatil@gmail.com

More books From Kavitasagar International Media Group, Jaysingpur