Maitra Jivanche (मैत्र जीवांचे) Abhishek Dnyaneshwar Thamake - Kavita Sagar, Jaysingpur
Maitra Jivanche (मैत्र जीवांचे) Abhishek Dnyaneshwar Thamake - Kavita Sagar, Jaysingpur

Maitra Jivanche (मैत्र जीवांचे) Abhishek Dnyaneshwar Thamake - Kavita Sagar, Jaysingpur

This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

Maitra Jivanche (मैत्र जीवांचे) Abhishek Dnyaneshwar Thamake - Kavita Sagar, Jaysingpur   ‘मैत्र जीवांचे’ हे मी एक लेखक म्हणून लिहिलेले पहिले पुस्तक आहे. आज युनिकोड स्वरुपात पुस्तक पुन्हा प्रकाशित करत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. जेव्हा आपण नवखे लेखक असतो, तेव्हा आपली भाषा वेगळीच अलंकारीत असते. हे सगळं आपण जाणूनबुजून करत नसतो, ते आपोआप घडत असतं. सोबतच जेव्हा तुम्ही तुमचे जुने साहित्य ब-याच वर्षांनी वाचत असता, तेव्हा तुम्हाला त्यातील त्रुटी आणि चुका लक्षात येतात आणि तुम्ही गालातल्या गालात हसू लागता. माझ्या बाबतीत देखील तेच झाले.   अग्निपुत्र, पुन्हा नव्याने सुरुवात आणि Terror Attack at डोंबिवली Station ही पुस्तकं लिहिल्यानंतर भाषा जेवढी प्रगल्भ झाली तेवढी ती आधी नव्हती, पण मला त्या दुरुस्त नाही करायच्या आहेत, त्यामुळे मी तेव्हा कसा होतो हे तुमच्या लक्षात येईलच. (एवढंही वाईट नाही हा!) पण पुस्तक वाचत असताना पुढील गोष्ट कायम लक्षात असू द्या, ही कादंबरी ऑक्टोबर २०११ मध्ये लिहिलेली फ्लॅशबॅक स्वरूपातील कादंबरी आहे. जेव्हा मुंबईमध्ये मेट्रो नव्हती आणि यु-ट्यूबवर एच.डी. संकल्पना नवीन होती, फेसबुक लोकांना कळू लागलं होतं आणि व्हॉट्सअप नुकतंच सुरु झालं होतं. (जुनी प्रस्तावना इथेच संपली, आता नवी प्रस्तावना सुरु.) आपण जन्म घेतो तेव्हा काही नाती आपल्याला जन्मतःच मिळतात, आई-वडील, भाऊ-बहिण,  इ. ही सर्व नाती रक्ताची असतात. तरीदेखील बाहेरच्या काही व्यक्तींशी आपला संबंध येतो. कालांतराने तो संबंध एका वेगळ्या नात्यामध्ये बदलतो. हे नातं रक्ताचं नसतं, हे नातं निर्माण करण्याचं संपुर्ण स्वातंत्र आपल्याला असतं, आणि म्हणुनच ‘मैत्री’ ह्या नात्याचं महत्त्व रक्ताच्या नात्याइतकंच, कदाचित त्याहूनही श्रेष्ठ आहे. ‘मैत्र जीवांचे’ कादंबरी लिहिण्यासाठी मला माझ्या एका मित्रानेच सुचविले होते. त्यावेळी मी ही गोष्ट मनावर घेतली नाही. कारण मी लिखाण काम करु शकत नाही हे मला चांगलंच ठाऊक होतं आणि मी उत्कृष्ट लिखाण करु शकतो हे माझ्या मित्र-मैत्रिणींना चांगलं ठाऊक होतं. मग काय? माझ्या नकळत सर्वांनी मला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. याचा परिणाम म्हणुन ८ ऑक्टोबर २०११ रोजी मी ‘मैत्र जीवांचे’ कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली आणि अर्ध्यावर थांबवली देखील. काही दिवसांनी माझी भेट एका जुन्या मैत्रिणीशी, शलाकाशी झाली. ब-याच दिवसांनी भेट झाल्याने आमच्या गप्पा बराच वेळ रंगल्या. त्या वेळी पुस्तकाचा विषय देखील निघाला. “कोणी काहीही म्हणालं तरी तू तुझं काम अर्ध्यावर सोडू नकोस.” असे अनेक सकारात्मक तिच्या मनातुन माझ्या विचारांमध्ये शिरत होते. ज्याप्रमाणे स्त्री-पुरुषाच्या मिलनानंतर एका नव्या जिवाच्या निर्मीतीची सुरुवात होते, अगदी तशीच सुरुवात त्या रात्री आम्हा दोघांच्या वैचारिक मिलनातुन झाली आणि त्यानंतर ८ जुलै २०१२ रोजी ‘मैत्र जीवांचे’ कादंबरी पुर्ण करता आले. गंमत म्हणजे लेखन करीत असलेला काळ हा नऊ महिन्यांचा होता. जसं की एक आई आपलं मुलं नऊ महिने आपल्या गर्भात ठेवते, तसंच नऊ महिने संस्कार होऊन ही कादंबरी पुर्ण झाली. कादंबरी लिहीत असताना मी नव्या पिढीच्या आचरणाचा जुन्या मैत्रीतील गोडव्याचा, प्रेमाचा, एकटेपणाचा, तंत्रज्ञानाचा पुरेपूर अभ्यास केला. हाती घेतलेलं हे काम पुर्ण करण्यासाठी मला फेसबुकवरील मित्र (गौरव गायकवाड, अश्विनी कुलकर्णी, विशाल कदम, निलेश कळसकर, बेथ्रिज बेविल्कुवा) यांची मदत झाली. नाशिक-पुणे पासुन ते अगदी ब्राझिल-जर्मनीपर्यंत अनेक मित्रमैत्रिणींनी मला मोलाचे सहकार्य केले. मी त्या सर्वांचा ऋुणी आहे. हे सर्व करत असताना कुणीतरी पाठीशी असावं लागतं. कुणाचा तरी आधार असावा लागतो आणि मला सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की, माझ्या पहिल्याच पुस्तकाच्या लिखाणासाठी माझ्या वडीलांचा मला हवा तसा पाठिंबा मिळाला. कादंबरी लिहून त्याची पहिली प्रत हाती येईपर्यंत त्यांनी मला अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. माझे वडील हे देखील माझे एक मित्रच आहेत. ही कादंबरी मैत्रीसारख्या गोड नात्यावर आधारीत असून कादंबरी पुर्ण होण्याचं श्रेय हे माझ्याइतकंच माझे वडील श्री. ज्ञानेश्वर सुधारक ठमके आणि पत्नी शलाका या दोघांना देखील जातं. ही कलाकृती ह्या दोन व्यक्तींमुळेच पुर्ण होऊ शकली. आणखी एका व्यक्तीचे आभार मानायचे आहे. ती व्यक्ती म्हणजे, अक्षर प्रभु देसाई. गुगल प्ले स्टोरमध्ये कादंबरी मोफत उपलब्ध करुन देऊन त्यांनी ही कलाकृती अनेकांपर्यंत पोहोचवली आहे. तसेच समीक्षक नंदकुमार शंकरराव गायकवाड आणि प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील, कविता सागर प्रकाशक, जयसिंगपूर यांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद. आपले प्रेम असेच असू द्या, लोभ असावा. - अभिषेक ज्ञानेश्वर ठमके   या कादंबरीत असलेली सर्व पात्रे, घटना आणि प्रसंग सर्व काल्पनिक आहेत. वास्तवतेशी जुळल्यास तो केवळ योगायोग समजावा. मराठी साहित्याचा ठेवा समृध्द करणारी उत्कंठावर्धक कादंबरी ‘मैत्र जीवांचे’ मनापासून मैत्री जगणा-या प्रत्येकास समर्पित केलेली अभिषेक ज्ञानेश्वर ठमके लिखित ‘मैत्र जीवांचे’ कादंबरी कविता सागर प्रकाशनचे सर्वेसर्वा माझे परममित्र आदरणीय डॉ. सुनील दादा पाटील यांनी मला वाचनासाठी दिली. ‘मैत्र जीवांचे’ या कादंबरीच्या नावापासूनच कुतूहल निर्माण झाले. फेसबुक, व्हाट्सअँप व आंतरजालच्या युगात निखळ मैत्रीची दृढ नाती प्रसंगी रक्ताच्या नात्यापेक्षाही पक्की करणारी ही कादंबरी शेवटपर्यंत मैत्रीची उत्कंठा वाढवणारी आहे. मैत्रीच्या नात्याने एकत्र आलेल्या तरुण - तरुणी कालांतराने त्यांच्यातील संबंधाने एका वेगळ्याच नात्यात, आयुष्यात एकत्र येतात परंतु त्यांच्यातील भावनिक कलहातून वितुष्ट निर्माण होते, त्यातून निर्माण झालेली स्थित्यंतरे सदर कादंबरीत सरळ साध्या सोप्या भाषेत अत्यंत नेटकेपणाने मांडण्याची त्यांची लकब वाखाणण्याजोगी आहे.  शरद - अशोक यांच्या संगीताने, अभिजितच्या दिलखेचक आवाजाच्या अदाकारीने, अजयच्या फोटोग्राफीने तसेच प्रसादच्या मंत्रमुग्ध करणा-या निवेदनाने अल्पावधीतच मुंबईतील मित्र - मैत्रीणींनी एकत्र येऊन उभारलेल्या बदमाश ग्रुपने संपूर्ण महाराष्ट्रात आपला दबदबा निर्माण केलेला असतो. परंतु एका संगीत स्पर्धेतील अपयशाने संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेल्या या बदमाश बँडला रसातळाला कसे जावे लागले; त्यातून सर्व मित्रांच्यात काशी ताटातूट झाली याचे वर्णन मनाला चटका लावून जाते. भारतीय विशेषकरून महाराष्ट्रातील तरुण - तरुणी शिक्षण घेऊन डिग्री मिळवतात परंतु भ्रष्ट राजकारण्यांच्यामुळे त्यांना नोकरीकरीता पैशाची मागणी केली जाते त्यातून त्यांच्या मनात धगधगणारा राग कसा व्यक्त होतो. तसेच मित्राचे लाईफ घडविण्यासाठी त्यांची धडपड कशी चाललेली असते हे प्रस्तुत कादंबरीत चांगल्या प्रकारे मांडण्याचा लेखकाचा प्रयत्न स्तुत्य आहे. नेहमी हसत खेळत असलेल्या, आपल्या अदाकारीने तरुणांना घायाळ करणा-या अभिजीतच्या जीवनात झालेले स्थित्यंतर त्यातून त्याच्या वर्तनात झालेला बदल त्याविषयी ऑफिसमधील स्टीफनने मांडलेले विचार, मैत्री अतूट राहण्यासाठी स्टीफनसह त्याच्या महाराष्ट्रातील मित्रांनी केलेली धडपड कादंबरीची उंची वाढविण्यात यशस्वी झालेले आहेत. ऑस्ट्रेलियात अभिजीत, गौरी व रुपाली एकत्र राहून अभिजितने करिअर करण्याचा प्रयत्न केला. गौरी व अभिजित यांच्यात मित्रत्वातून निर्माण झालेले पती - पत्नी यांचे नाते. वागण्यात बदल घडावा यासाठी गौरीने जर्मन पर्यटनाचे केलेले आयोजन. पर्यटनानंतर अभिजितमध्ये झालेला बदल घरातील तसेच ऑफिसमधील सर्व कर्मचा-यांना थक्क करून सोडतो. मित्रांपासून दूर फेकलेल्या, परदेशात नोकरी निमित्त स्थायिक झालेल्या अभिजीतला जुन्या आठवणीने घायाळ केल्यामुळे अंतर्मुख बनलेल्या अभिजीतला परत भारतात आणण्यासाठी प्रयत्न करणा-या तसेच गैरसमजातून दूर गेलेला प्रसाद त्याच्यासाठी कोणते प्रयत्न करतो; त्यासाठी रुपाली व स्टीफनची मदत कशी होते हे भावनापूर्ण शब्दात लेखकाने मांडलेले आहे. ‘गरीबाच्या वाड्या’वरील मित्रांच्या गप्पाटप्पा, मैफली बाबतचे विचार, वादविवादातून निर्माण झालेले प्रसंग, साहित्याची मोडतोड ह्यातून निर्माण झालेली एकटेपणाची वृत्ती त्यातून निर्माण झालेले संघर्षमय जीवन, या संघर्षमय जीवनाच्या अंधारातून मैत्रीच्या प्रकाशाकडे जाणारा एक धागा पकडून लेखकाने मांडलेले विचार, त्यातून निर्माण झालेली तगमग याचा हृदयस्पर्शी अनुभव या ‘मैत्र जीवांचे’ या कादंबरीतून व्यक्त होतो. जर्मन पर्यटनासाठी अभिजित व गौरी यांच्या जाण्याने त्या दोघांमध्ये असलेले भूतकाळातील गैरसमज, टॉमला पुत्ररत्नाने झालेला आनंद, त्याने अभिजितला सांगितलेली ही आनंदाची बातमी, त्यातून अभिजित व गौरी यांच्यात जर्मन पर्यटनात निर्माण झालेले शारीरिक आकर्षण, अभिजितमध्ये झालेला बदल, त्यातून गौरी व अभिजित यांच्यात निर्माण झालेल्या आशा - आकांक्षा पाहून कार्यालयातील सर्वांनाच थक्क करणारे लेखक अभिषेक ज्ञानेश्वर ठमके यांनी केलेले वर्णन कथानकाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. अभिजितसोबत पाच वर्षे काम करणा-या स्टीफनला अभिजितच्या व्यक्तिमत्वाबद्दल आकर्षण असते. त्यातून अभिजितच्या अनुपस्थितीत रुपालीशी संपर्क साधून स्टीफनने फेसबुक, इंटरनेटच्या माध्यमातून त्यांच्या सर्व मित्र - मैत्रिणींची माहिती गोळा करून अभिजितसह इतर मित्र - मैत्रिणींना एकत्र आणून त्यांच्यात पूर्वीचा आनंद निर्माण करण्यासाठी स्टीफनने भारतात येऊन महाराष्ट्रातील बदमाश बँडला एकत्र आणण्याचा केलेला प्रयत्न याचे हृदयस्पर्शी वाचन करतांना कादंबरीचा शेवट कसा झाला हे कळतच नाही. ‘मैत्र जीवांचे’ या कादंबरीचा शेवट बदमाश बँडबाबत विचार करण्याच्या स्टीफनच्या प्रश्नाने ह्या बँडच्या भावविश्वात तर्कवितर्क मांडण्यात लेखक अत्यंत यशस्वी झाले आहेत. ‘मैत्र जीवांचे’ ही कादंबरी लिहिण्यासाठी त्यांच्या मित्र - मैत्रिणींनी दिलेले प्रोत्साहन, आई - वडिलांचे मार्गदर्शन, पत्नीची मदत, गुगल प्ले स्टोरवर कादंबरी उपलब्ध करून देणारे अक्षर प्रभूदेसाई, इंटरनेटच्या माध्यमातून व प्रकाशनाची जबादारी स्वीकारणा-या जयसिंगपूर येथील कविता सागर प्रकाशनाचे प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील अशा दिग्गजांच्या प्रयत्नातून साकारलेल्या या अद्वितीय कादंबरीस व प्रतिभावान लेखक अभिषेक ज्ञानेश्वर ठमके यांना लाख - लाख शुभेच्छा!     - नंदकुमार शंकरराव गायकवाड (जयसिंगपूर) 9822469955     ·        कादंबरी - मैत्र जीवांचे ·       ISBN 978-81-934308-8-0 ·        कादंबरीकार - अभिषेक ज्ञानेश्वर ठमके ·        प्रकाशक - डॉ. सुनील दादा पाटील ·        प्रकाशन - कविता सागर प्रकाशन, जयसिंगपूर ·        संपर्क - 02322 225500, 9975873569 ·        ईबुक - http://www.readwhere.com/read/1302648/Maitra-Jivanche-   ·        गुगल - https://youtu.be/N8wdPwuVR7g

More books From KavitaSagar Publishing House, Jaysingpur (Kolhapur)