नाभिकायन  : एका नाभिक शिक्षकाची कहाणी
नाभिकायन  : एका नाभिक शिक्षकाची कहाणी

नाभिकायन : एका नाभिक शिक्षकाची कहाणी

  • एका नाभिक शिक्षकाची कहाणी
  • Price : Free
  • pravin.kubal33
  • Language - Marathi
This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

शाळा सुरु होण्यातील स्वानंद लेख पहिला 

 

कधी एकदा शाळा सुरु होते असे सर्वांनाच झाले आहे. मी तर एक शिक्षक आहे. मला लागलेली ओढ मीच सांगू शकतो. विविध संपर्क माध्यमे वापरून आता अगदी कंटाळा आला आहे. मुलांना मंदिरात बोलावून अभ्यास देत असताना मार्गदर्शन करावे लागे. एक दिवस आड करून मुलांशी संवाद साधताना मुलांनाही आपल्या घराचा कंटाळा आल्याचे प्रकर्षाने जाणवतय. 

मी सुद्धा घराचा कंटाळा येत होता म्हणून शालेय परिसराकडे जात असे. मुलेसुद्धा ठरवलेल्या ठिकाणी वेळेअगोदर येऊन वाट बघत थांबलेली असत. त्यांना अभ्यास करता यावा यासाठी थोडे सुलभीकरण करून देण्याचा प्रयत्न करत होतो. स्वाध्यायकार्डे, स्वाध्यायपुस्तिका , साप्ताहिक अभ्यासमालिका यांचा वापर करत होतो. मुले बऱ्यापैकी प्रतिसाद देताना दिसत होती. माझाही उत्साह अधिक वाढत चालला. पण कोविड नियमावलीचे पालन करावयाचे होते. त्यात गफलत करून चालणार नव्हती. 

घाबरत घाबरत मुले आणि शिक्षक यांचे अध्ययन,अध्यापन चालले होते. दर आठवड्याला शासनाकडे अहवाल पाठवायचा होता. तो खरा पाठवायचा होता.ज्या विद्यार्थ्यांशी संपर्क झाला नाही, त्यांचीही आकडेवारी भरायची होती. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क करण्याशिवाय पर्यायच नव्हता. मग काय, लागलो कामाला. सर्व पालकांचे संपर्क क्रमांक गोळा केले. त्यांना फोन केले. मुलांशी थेट वैयक्तिकपणे बोलायला सुरुवात केली. 

कधी एका विद्यार्थ्याबरोबर बराच वेळ बोलल्याने तेच तेच इतरांबरोबर बोलून तोंड दुखू लागले. मग सहा जणांचे ग्रुप करून कॉन्फरन्स कॉल करू लागलो. जरा काम सोपे झाले. पण गणित, विज्ञान असे विषय समजून देण्यात अडचणी येऊ लागल्या. त्यासाठी व्हिडीओ तयार करून यु ट्युब वर अपलोड केले. शाळेत असताना दिवसामध्ये सहा तास मुलांच्या समोर असणारा मी आता सकाळपासून रात्रीपर्यंत मुलांसाठी मी आज काय करू शकतो ? याचाच विचार करू लागलो.

यासाठी विविध उपक्रम राबवू लागलो. अर्थात सर्व उपक्रम राबवताना मुलांशी प्रत्यक्ष संपर्क न करता राबवताना माझी जी तारांबळ उडाली ती माझ्या घरातले बघत होते. त्यांनी मला खूप सहकार्य केले. गुगल फॉर्म पासून चाचण्या बनवून त्या दररोज स्टेटसवर ठेवू लागलो. त्याला अनेक शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थी आणि शिक्षक दोन्ही माझ्या गुगल चाचण्यांची वाट पाहू लागले. मलाही हुरूप येत गेला. मुले अभ्यास करतायत म्हणून पालकही खुश. पण शाळा ती शाळा. तिचं वेगळेपण काहीही केलं तरी जाणवतच होतं. आता शाळा सुरु होणार असं समजलं आणि माझा जीव भांड्यात पडलाय. कधी एकदा शाळा सुरु होते आणि माझे विद्यार्थी शाळेत येतायत असं मला झालं आहे. 

 

© प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( ९८८१४७१६८४ )



 


 



  माझ्या पहिल्या नेमणूकीची गोष्ट लेख दुसरा 

 

१९९६ सालातली गोष्ट. मी नुकताच डी. एड्. झालो होतो. निकालही माझ्या मनासारखा लागलेला. अध्यापक महाविद्यालयात दुसरा आल्याचा आनंदही गगनात मावेनासा झालेला. निकाल दररोज सकाळ, दुपार, संध्याकाळ नुसता पाहत बसत असे. रात्री मस्त स्वप्नामध्ये रंगून जाई. स्वप्नातच एखाद्या शाळेत शिक्षक बनून गेल्याचा भास होत राही. मी खडबडून जागा होई. उगीचच जाग आली म्हणून पुन्हा झोपून तसंच स्वप्न पडावं याचा विचार करत असताना कधी झोप लागे कळतही नसे. 

नोकरी नसल्यामुळे दुकानात जावे लागायचे. आमचे दोन खुर्च्यांचे सलून होते. त्यात बाबा आणि काका काम करायचे. बाबांनी मला सलूनात काम करायला शिकवले होतेच. आता मला नोकरी मिळेपर्यंत तेच करायचे होते. बारावी सायन्समध्ये ७४ % गुण मिळवलेला मी त्यावेळी परिस्थिती नसल्यामुळे डी.एडला गेलो होतो. गिऱ्हाईकांची केसदाढी करताना मला सतत नोकरीची चिंता भेडसावत होती. 

मी आतल्या आत धुमसत होतो. बाबांनी सांगितलेली सगळी कामे मनापासून करत असलो तरी मी खुश नव्हतो. त्यावेळी आमच्या दुकानात येणाऱ्या वृत्तपत्रात जाहिराती पाहण्याचा मला छंदच जडला होता. एकदा एक अशीच जाहिरात वाचली.  ' शिक्षक पाहिजे ' या जाहिरातीने मला हायसे वाटले. एक दाढी झाली कि मी पुन्हा तीच जाहिरात वाचताना बाबांनी मला पाहिले. ते म्हणाले , तू आता आधी दुकानात काम कर . जाहिराती वाचून नोकरी मिळत नाही. मला रडूच कोसळले. मी रागाच्या भरात बाबांना उलट काहीतरी बोलून गेलो. भर दुकानात मला रडू आवरेना. मी स्फुंदून स्फुंदून रडू लागलो. रडता रडता बोलत होतो आणि बोलता बोलता रडत होतो. बाबांनी मला तोंड काळं कर असं म्हणून घरी पाठवलं. घरी आलो. आईला घडलेली घटना मोठ्याने हुमसून हुमसून सांगून टाकली. 

आईने मला जवळ घेतले. मला खूप धीर वाटला. आईच्या कुशीत शिरलो. आज माझी आई हयात नाही. पण तिच्या प्रेमाची ऊब मला नेहमीच पुढे जाण्यासाठी प्रेरणादायी असेल. तिने रात्रीच बाबांना सांगून टाकले. " आपला मुलगा आता मोठा झालाय, त्याला पाठवा नोकरीच्या शोधात. " बाबांना मग आईचे ऐकावेच लागले. मी कपडे भरुन तयारच होतो. नोकरीची जाहिरात रत्नागिरी जिल्ह्यातील होती. कणकवलीपासून एस्.टी. ने ४ तास तरी जायला लागतात. २१ वर्षांचा मी रत्नागिरी गाठली. 

माझे छोटे मामा रत्नागिरी येथे रहात असल्याने मला त्यांची मदत घेऊन नोकरी मिळवायची होती. दोघेही नोकरीला असल्याने त्यांचा आदर्श माझ्यासमोर होता. पटवर्धन हायस्कूलसारख्या रत्नागिरी शहरातील नावाजलेल्या शाळेत इंटरव्ह्यु द्यायचा म्हणजे सोपी गोष्ट नव्हती हे मला तिथे गेल्यानंतर समजलं. हायस्कूलच्या प्राथमिक विद्यामंदिरात एकच शिक्षक हवा होता. पण त्या एका जागेसाठी ४० पेक्षा जास्त उमेदवार आले होते. मी एकटाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होतो. सर्वजण रत्नागिरीतील होते. मी अगदी साध्या कपड्यात गेलो होतो. मोठ्या भावोजींनी मला एक पांढरा शर्ट आणि मातकट पँट दिली होती. ती मापाने खूपच मोठी होती. बाबांनी ती माझ्या मापाची करुन दिली होती. तरीही ती मला फिट बसत नव्हती. पट्टा लावला तरी खाली सुटत होती. त्यावेळी मी काटकुळा असल्यामुळे पँटचा नाईलाज होता. 

सगळ्या उमेदवारांकडे मी पाहून घेतले. भितीने पोटातला गोळा मोठा होत होता. मामा मला सोडून कामावर कधीच निघून गेले होते. आईबाबांची आठवण आली. संकटसमयी मला नेहमीच आईची आठवण अजूनही येते आणि जीव कासावीस होतो. धीर एकवटून सभागृहातील बेंचवर खिळून बसलो. प्रशासनाधिकारी आले. त्यांनी काय परीक्षा घेणार ते धीरगंभीर आवाजात समजावून सांगितले. ' आदर्श शिक्षकाची माझ्या मनातील कल्पना ' असा निबंध लिहिण्यास सांगण्यात आला. मी माझी शब्दशक्ती वापरुन निबंध लिहिला. त्यानंतर प्रत्येकाचे नाव पुकारुन बोलावले गेले. माझे सगळे कागदपत्र म्हणजे मी होतो. सगळे टापटिप , मी मात्र मलाच गबाळा वाटू लागलो. इतरांच्या कपड्यांना पाहून मला माझीच लाज वाटू लागली. 

बारावीचे मार्कलिस्ट बघून समोरचे परिक्षक खुश झालेले दिसले. योगप्रवेश परीक्षा पास झालेले सर्टिफिकेट पाहून ते अधिक चमकलेले दिसले. मला १२०० रु. इतका मासिक पगार सांगण्यात आला. तुम्हाला आम्ही पत्राने कळवू हे त्यांचे शेवटचे वाक्य मला दिलासा देणारे असले तरी एवढ्या भारी लोकांमधून माझी निवड होणार नाही याचीही खात्री झालेली. दोन चार दिवस थांबून परत कणकवलीला आलो. 

पुन्हा सलून एके सलून सुरू झाले. आणि पोस्टमनने पांढऱ्या लखोट्यातले माझ्या नावचे पत्र आणून दिले. मी ते वाचले. त्यात त्यांनी मराठीचा पाठ घ्यायला बोलावले आहे असा उल्लेख केला होता. मी आनंदाने उडीच मारली. बाबांनाही माझा अभिमान वाटला. त्यांनी मला जायला परवानगी दिली. जवळ घेऊन गोंजारले. मला ज्या प्रेमाची गरज होती ते मिळाल्याने मी त्यांना अधिकच बिलगलो. त्यांनी आम्हा भावंडांना त्यांच्या ऐपतीप्रमाणे सर्व गोष्टी देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. 

रत्नागिरीला पोहोचलो. गाण्याची आवड असल्यामुळे शिकवण्यासाठी कविता निवडली. ३ रीच्या वर्गात ६० मुले दंगा करत होती. मी सुरेल आवाजात कविता गायला सुरूवात केली. मुले चिडिचूप गप्प झाली. मुलांशी गप्पा मारत, संवाद साधत ३० मिनिटे कधी संपली मला आणि मुलांनाही समजले नाही. माझ्यासारख्या आणखी १२ जणांना त्यांनी पाठ घ्यायला बोलावले होते.

२ दिवसांत कळवतो म्हणाले. मी रत्नागिरीतच थांबलो. त्यावेळी फोनची सुविधा माझ्या मामांकडेही नव्हती. मी दुपारी जेवून झोपलो होतो. पत्र्याच्या दरवाजावर कोणीतरी ठोठावले. मी जागा झालो. दरवाजात हायस्कुलचा शिपाईमामा दुसरे पत्र घेऊन उभा. मी पत्र वाचले. त्यात उद्या गणितचा पाठ घ्यायला या असे लिहिले होते. मी तयारीला लागलो. ४ थी अपूर्णांक घटक घेण्याचे ठरवले. कागदाच्या चपात्या बनवून पाठ घ्यायला गेलो. वर्गातील मुले अवखळ दिसली. त्यांच्या वयाचा होऊन त्यांना कागदाच्या चपात्या खायला देत खेळातून पाव, अर्धा, पाऊण , पूर्ण या संकल्पना समजेपर्यंत शिकवल्या. मुलांनी कृतीयुक्त सहभाग घेतल्यामुळे माझा हा पाठसुद्धा चांगला झाल्याचे दिसत होते. पण मनात धाकधूक होतीच, कारण यावेळी माझ्यासारखे अजून ५ जण पाठ घ्यायला आले होते. प्रशासनाधिकारी जोगसर आले आणि माझ्या गळ्यात हात घातला. ते म्हणाले ,  " तुला घरी कोणत्या नावाने हाक मारतात रे ? " ते मला माझे आजोबाच वाटले. मला नातवाला ते विचारत होते असं वाटून मीही सांगून टाकले ' बाळू ' . ते अतिशय प्रेमाने अधिक जवळ येऊन मला म्हणाले , " बाळू , तू उद्या येऊन तुझी ऑर्डर घेऊन जा." आता मात्र मला ते स्वप्नच वाटलं. पण त्यावेळी मी खरंच मला करकचून चिमटा काढून बघितला. माझी नेमणूक झाली हे माझं जागेपणीचं स्वप्नंच होतं माझ्यासाठी कायमचं.

 

© प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( ९८८१४७१६८४ )



 


 



अविस्मरणीय शाळा  लेख तिसरा 

 

          कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरमधील शिक्षक ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट होती. मला दुसरीचा वर्ग देण्यात आला. पटवर्धन हायस्कूलद्वारा चालवली जाणारी रत्नागिरीतील ती एक प्रसिध्द शाळा असा उल्लेख केला तरी तो चुकीचा ठरणार नाही. नगर परिषदेच्या २२ शाळांमध्ये ही तेवीसावी. त्यावेळी १ ली ते ४ थी चे प्रत्येकी दोन तुकड्यांप्रमाणे एकूण आठ वर्ग होते. पहिली गुलाब , पहिली चमेली , दुसरी ज्ञानेश, दुसरी मुक्ताई, तिसरी ध्रुव, तिसरी प्रल्हाद, चौथी शिवाजी, चौथी महाराणा प्रताप अशी तुकड्यांची नावे. माझ्या तुकडीचे नाव दुसरी मुक्ताई. 

          माझ्या वर्गात एकूण ६० विद्यार्थी होते. मी वर्गात प्रवेश केला. राष्ट्रगीताची घंटा कानावर पडताच मुले सावधान स्थितीत उभी राहिली. मुले त्या ४२ सेकंदात ६० प्रकारच्या हालचाली करताना दिसत होती. त्यांना बिचाऱ्यांना राष्ट्रगीताचे महत्त्व ते काय माहित ! ! ती निरागस भाबडी मुले पाहून मला त्यांना किती शिकवू आणि किती नको असे झाले होते. मी त्यांच्यासाठी नवखा होतो. मुलांनी मला ' काका ' म्हणायला सुरुवात केली. त्यांना कुठे माहिती होते कि मी त्यांचे नवीन सर होतो ते ? थोड्याच वेळात मुख्याध्यापिका शीतल काळेमॅडम आल्या. त्यांनी मुलांना अगदी नीट समजावून सांगितले. त्यानंतर मुलांनी टाळ्या वाजवून माझे स्वागत केले. मला त्यावेळी जो आनंद झाला तो काय वर्णावा ! इंजिनिअर झालो असतो, कदाचित डॉक्टरही. 

पण शिक्षकी पेशामध्ये मिळणारा हा आनंद आगळा वेगळाच असतो. त्यासाठी शिक्षकच व्हावे लागते. मी मुलांशी त्यांच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न सुरु केला.  मुले सर्व प्रकारची होती. अत्युच्च , उच्च आणि मध्यमवर्गीय पालकांची मुले असल्याने ती बोलकी होती. पहिल्या दिवशी त्यांनी मला अनेक प्रश्न विचारुन भंडावून सोडले. त्यानंतर मी ६ ते ७ शाळांमध्ये सेवा केली तरी हाच दिवस मला सुखावणारा वाटत राहतो. माझी आणि मुलांची पहिल्या दिवसापासून गट्टी जमली. माझं लटक्या रागानं पाहणं , ओरडणं त्यांना समजू लागलं. मी त्यांना माराची भिती दाखवली, पण मारले मुळीच नाही. माझे व्यक्तिमत्त्व अजिबात आकर्षक नव्हते. पण मुले व्यक्तिमत्व नाही, तर स्वभाव बघतात. त्यांनी माझ्या दिसण्याकडे नाही , तर असण्याकडे लक्ष दिलं असावं. त्यावेळी माझ्या डोक्यावर दाट केस होते. आता ते शोधावे लागतात इतकेच. 

          मला कणकवली डी.एड. कॉलेजला असताना मिळालेल्या मित्रमैत्रिणींच्या सहवासाने घडवले म्हणायला हरकत नाही. तेथे दोन वर्षात सर्वांमधील विविध सुप्त क्षमता बघून माझ्यातला खरा शिक्षक जागा झाला आणि मी घडत गेलो. मला त्यावेळी सगळ्यांची इतकी साथ मिळाली कि मी माझ्या वर्गमित्रांना ( मैत्रिणींनाही ) कधीच विसरणार नाही. आता बर्‍याच वर्षांनंतर ते मला माझ्या केसांमुळेच ओळखू शकत नाहीत ही खरी गोष्ट असेल कदाचित. पण केस गेल्यामुळे किंवा माझ्या टकलामुळे माझे कधीच कुठे अडले नाही हे मी इतक्या वर्षांनंतरही ठामपणे सांगू शकतो. 

          परिपाठापासून शाळा सुटेपर्यंत मी मुलांना अभ्यासात एवढा गुंतवून ठेवी कि मुले शाळा सुटली तरी घरी जायला बघत नसत. मी सतत कामच करत असे. शाळेत एकूण ८ शिक्षिका होत्या, मी एकटाच पुरुष शिक्षक होतो. मी मालवणी होतो. त्या सगळ्या शुद्ध भाषा बोलणार्‍या होत्या. मी त्यांच्या संस्काराने सर्व शिकलो. त्यांनी मला सर्व जबाबदाऱ्या दिल्या. दैनंदिन फलकलेखन करायला दिले. बाहेरील कोणतेही काम , सुशोभन इत्यादी करताना त्यांना माझ्या कल्पना आवडू लागल्या. 

पण भरसभेत पालकांसमोर त्या जितक्या धीटपणाने बोलत , तेवढं मला जमत नसे. मला ते अधिकारीवर्ग असलेले पालक पाहून त्यांच्याशी बोलताना संकोच वाटे. त्यातील माझे बहुतांशी पालक महिला असत. त्यांच्याशी बोलताना तर मी कमालीचा लाजून जाई. पण त्या महिला पालकांनी मला विश्वास दिला. त्या दररोज मुलांच्या अभ्यासाविषयी माझ्या वर्गात येऊन माझ्याशी बोलत असत. त्यामुळे मला धीर येत गेला. माझ्या शिकवण्याबद्दल मुले घरी जाऊन पालकांना सांगत असत. त्यामुळे पालकदेखील माझ्यावर खुश होते. हळूहळू माझ्यातला आत्मविश्वास वाढत गेला. मी एखाद्या कार्यक्रमामध्ये मला मुख्याध्यापिका यांनी दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडू लागलो. माझे अक्षर वळणदार असल्यामुळे मला लिखाणकामही देण्यात येऊ लागले. मी आपला देतील ते काम आपलेपणाने करतच गेलो. कधीही नकार दिला नाही. त्यामुळे मी सगळ्या प्रकारची शैक्षणिक कामे करण्यात पटाईत झालो. 

तेथे सर्व सहशालेय उपक्रम समारंभपूर्वक साजरे केले जाण्याची पद्धत मला खूप आवडली. कार्यक्रम झाल्यानंतर त्याचे अहवाललेखन बर्‍याचदा मला करण्याची संधी मिळाली. मी संधीचे सोने करत गेलो. कंटाळा करणे माझ्या रक्तातच नाही. फक्त आर्थिक बाबतीत कमी पडत आहे हे मुख्याध्यापिका मॅडमांच्या लक्षात आले. कारण मला त्यावेळी १२०० रु. पगार होता. मामांकडे खानावळ ३०० रु. देत होतो. ती कमीच होती. पण मामा मामींनी माझ्याकडे कधी खानावळ मागितली नाही. पण मी त्यांच्याकडे पैसे न देता राहणे मला स्वतःला पटणारे नव्हते. पगार झाला कि मी कणकवली गाठत असे. माझा सगळा पगार मी बाबांकडे देई. मी त्यातील एकही रुपया कधी माझ्याकडे ठेवला नाही. 

          आर्थिक प्रश्न सुटावा म्हणून मॅडमांनी मला शाळेतच वर्ग सुरु होण्याअगोदर एक तास लवकर येऊन जादा क्लास घेण्यास सांगितले. मला क्लाससाठी २० विद्यार्थी मिळाले. प्रत्येकी ३० रु. मासिक फी घेऊन मला महिना ६०० रु. मिळू लागले. मी त्यातील ३०० रु. खानावळ आणि ३०० रु. कणकवली ते रत्नागिरी प्रवास यासाठी वापरुन सगळा पगार जसाच्या तसा घरी कायमच दिला. मामा त्यावेळी कोकणनगरला राहात. मी एक ५०० रुपयांची जुनी लेडीज सायकल घेतली. सायकलनेच मी शाळेत जाऊ लागलो. 

          १५ जून ते नोव्हेंबर १९९६ असे सहा महिने मी तिथे नोकरी केली. मी तिथे काम करताना सहा महिन्यात शिकलेल्या गोष्टींचा मला पुढील जीवनात अजूनही उपयोग होतो आहे आणि होत राहील. मला तिथली नोकरी सोडताना ज्या जोग सरांनी पाठबळ दिले होते , ते म्हणाले ,  " अरे , आम्हांला आता पुन्हा तुझ्यासारखा शिक्षक शोधावा लागणार." आता मी त्या शाळेत नसलो तरी त्या पहिल्या शाळेत म्हटली जाणारी प्रार्थना अजूनही म्हणतो आहे आणि मी जणू त्याच शाळेत असल्याचा मलाच दिलासा देत आहे ...... 

 

दयासागरा सद्गुणांचा निधी तू , 

सदासर्वदा रक्षी आम्हासी रे तू , 

तुझ्या भक्तिरुपे तुला ओळखावे , 

तुला आठवावे , तुला रे पहावे .

 

© प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( ९८८१४७१६८४ )

 

 


 




माझी चेकपोस्ट ड्युटी लेखांक ४

 

२१ मार्च पासून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने सांगितल्याप्रमाणे माझे दैनंदिन ऑनलाईन अभ्यास पाठवण्याचे काम सुरु झाले होते. त्यासाठी दिवसाचे बरेच तास अभ्यास साहित्य बनवण्यामध्ये घालवत होतो. साहित्य बनवण्याच्या दृष्टीने आधी नियोजन करावे लागत होते. १० मिनिटांच्या व्हिडिओसाठी २ ते ३ तास बसून लॅपटॉपसमोर प्रयत्न सुरु होते. सर्व विद्यार्थ्यांना फोन करून सांगत होतो. शाळेपेक्षा जास्त वेळ अभ्यास तयार करणे, पाठवणे आणि केलेला अभ्यास तपासणे या गोष्टींसाठी जात असला तरी मुले शिकत आहेत याचा आनंद होत होता. काही मुलांपर्यंत पोहोचणे कठीण झाले होते. त्यांच्यापर्यंत कसे पोहोचता येईल याचाही विचार करत होतो. 

अचानक आमच्या Whats App ग्रुपवर एक ऑर्डर येऊन धडकली. मी आपली सहजच वाचली. त्यात माझे नाव होते. मला चेकपोस्टची ड्युटी लागली होती. खारेपाटण चेकपोस्टला जायचे होते. रात्री ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत १० तासांची ड्युटी करण्याबाबत ऑर्डरमध्ये उल्लेख होता. माझे काही मित्र माझ्यासोबत असल्यामुळे मी निश्चिन्त होतो. आतापर्यंत मतदान, जनगणना, बी.एल.ओ., पल्स पोलिओ आणि इतर कामे केली होती. हेच काम करायचे बाकी राहिले होते. पहिल्यांदाच माझी ऑर्डर असल्यामुळे थोडे अप्रूपही वाटले. 

चेकपोस्टवर पोलिसांप्रमाणे ड्युटी करावी लागणार होती म्हणून एक वेगळाच अनुभव मिळणार या आनंदाने प्रेरित झालो होतो. मग काय स्वतः तहसीलदार कचेरीत जाऊन ऑर्डर ताब्यात घेतली. रात्रभर जागे राहावे लागणार होते. दुपारी २ - ३ तास सलग झोपण्याचा प्रयत्न केला. झोप काही येईना. शेवटी उठलो. मुलांना दुसऱ्या दिवशी पाठवायच्या अभ्यासाच्या तयारीला लागलो. घरातल्या सर्वांची मनाची तयारी केली. लहान मुलीला कसेतरी समजावून जेवल्यानंतर रात्रीच्या पहिल्यावहिल्या ड्युटीला निघालो. ती मी दिसेनासा होईपर्यंत रडत होती. जरा पुढे गेल्यानंतर मलाही रडावेसे वाटले. पण रडून उपयोग नव्हता. ६० - ७० च्या स्पीडने खारेपाटण चेकपोस्ट गाठले. 

तिथे आधीचे ड्युटीवाले ड्युटी सोडून चाललेले दिसले. मी सॅनिटायझर लावून आणि तोंडाला घट्ट मास्क लावून कामावर हजर झालो. जुन्यांकडून काम समजावून घेतले. आम्हा शिक्षकांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना बाहेरील जिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्याची ड्युटी देण्यात आली होती. 

लोकांची नुसती रिघ लागली होती. लोक कोरोनाच्या भीतीने आपापले गाव गाठत होते. १४ दिवसांचे संस्थात्मक विलगीकरण सुद्धा आनंदाने स्विकारत होते. विलगीकरणाचे संमतीपत्र भरून दिल्यानंतरही लोक थँक्यू म्हणत होते. लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना बघून जीव कळवळत होता. पण त्यांच्यापासून सुरक्षित अंतरावर राहून बोलत होतो. तोंडाला मास्क लावल्यामुळे चष्म्यावर वाफ जमा होत होती. ती पुसण्यात वेळ जात होता. मला संगणकीय काम देण्यात आले. 

मी आलेल्या सर्वांची नोंद ऑफलाईन किंवा ऑनलाईन करत होतो. प्रत्येक व्यक्तीचे १५ ते १६ कॉलम भरण्याचे काम सलग करूनही सकाळपर्यंत पूर्ण होत नव्हते. अर्थात झोप घेताच येत नव्हती. असे सलग १० दिवस काम केले. पोलीस बिचारे १२ तासांची ड्युटी करून हैराण झाले होते. त्यांनीही कित्येक लोकांना आपल्याकडील पाणी दिले , खाऊ दिला. कधी कधी झोपण्यासाठी आपल्याकडील चादरही दिली. पोलिसांमधील मानवता पाहून गहिवरून गेलो. पोलिसांना काम करताना आमच्यापेक्षा त्रास होत होता. पण तरीही न कंटाळता ते करताना पाहायला मिळत होते. सर्वांशी मैत्री झाली. त्यांच्यातील प्रेमळ माणूस बघायला मिळाला.

तीन वेळा ड्युटी केली. शाळेतही ड्युटी केली. ऑनलाईन अभ्यास देण्याचे काम सुरूच होते. कित्येक कर्मचाऱ्यांनी हा अनुभव घेतला. नातेवाईकांचे फोन येऊ लागले. आम्हाला चेकपोस्टला अडवू नका, पुढे सोडा अशा विनंत्या होऊ लागल्या. सर्वांना नियमानुसारच सोडण्यात येत होते. तरीही आम्ही त्यांना दिलासा देत होतो. तुम्ही या, आम्ही आहोतच. तुम्हाला लगेच सोडतो. २ - ३  तासांनंतर सोडून सुद्धा लोक धन्यवाद देत असताना दिसत होते. लोक आपल्यासमोर असे हवालदिल होताना बघून प्रत्येकवेळी आमचाही जीव कासावीस होत होता. देवा, पुन्हा अशी ड्युटी नको या मागणीशिवाय मी आता काहीही मागणार नव्हतो.

 

© प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( ९८८१४७१६८४ )

 

 


 

  

सीमा नसलेली शाळा लेखांक ५ 

 

          

About Readwhere

Readwhere is an online reading & publishing hub. Read epaper, magazines, books, comics etc. online & offline. It provides the best content for reading on web, Mobile and Tablet Devices. It includes popular News Papers, Magazines, Comics, Books & Journals, all within the same application. Read content from some of the premier newspapers of India, most read magazines and popular comics. Newspapers are free to read. The languages covered include English, Hindi, Marathi, Malayalam, Tamil, Telugu, Punjabi, Gujarati and Kannada. Magazines include some of India's best known Magazine brands, publishing on categories ranging from News, Bollywood, Entertainment, Health, Art and Architecture, Automotive and many more. Our comic book collection will bring back your child hood. Over 700+ titles from famous comic book publishers of India. Several of these comics are out of print and hence can be read only via the readwhere. Our eBook collection covers many interesting Books, which are from well known publishers and are best sellers in their own right. This include books on various subjects taught in School, Kids Books, Books on Health and Wellness, Astrology, Novels, Personal and Professional Growth, Management to name a few.